मकरसंक्रांत : हळदीकुंकू करण्याचे महत्त्व

मकरसंक्रांत ते रथ सप्तमी या दिवसांत ठिकठिकाणी वैयक्तिक, तसेच सार्वजनिक स्तरावर हळदीकुंकू समारंभ साजरे केले जातात. हळदीकुंकू समारंभ या दिवसांतच साजरे करण्याचे महत्त्व आणि ते कसे साजरे करावेत, याविषयाची माहिती खालील लेखातून समजून घेऊया.

१. मकरसंक्रांतीला हळदीकुंकू करण्याचे आणि तेव्हा देण्यात येणार्‍या वाणाचे महत्त्व

अ. मकरसंक्रांतीच्या दिवशी उत्तरायणाचा आरंभ

‘मकरसंक्रांतीच्या दिवशी ब्रह्मांडाची चंद्रनाडी कार्यरत झाल्याने सूर्याच्या उत्तरायणामध्ये ब्रह्मांडात रज-सत्त्वात्मक लहरींचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे हा काळ साधना करणार्‍यांना पोषक असतो.

आ. हळदीकुंकू करण्याचे आध्यात्मिक महत्त्व

अशा पोषक काळामध्ये हळदीकुंकू करणे हे जिवाच्या दृष्टीने जास्त लाभदायक असते. हळदीकुंकवाच्या माध्यमातून आपण सुवासिनींच्या रूपात घरी आलेल्या साक्षात् आदिशक्तीचीच पूजा करत असतो. हळद आणि कुंकू लावल्यामुळे सुवासिनींमधील श्री दुर्गादेवीचे अप्रकट तत्त्व जागृत होते अन् श्रद्धापूर्वक हळद-कुंकू लावणार्‍या जिवासाठी कार्य करते. हळदीकुंकू करणे, म्हणजे एकप्रकारे ब्रह्मांडातील सुप्त आदिशक्तीच्या लहरींना जागृत होण्यासाठी त्यांना आवाहन करणे होय. हळदीकुंकवाच्या माध्यमातून जीव एकप्रकारे दुसर्‍या जिवातील देवत्वाची पंचोपचारातून पूजाच करत असतो. हळदीकुंकू आणि वाण देणे आदी विधीतून जिवावर सगुण भक्तीचा संस्कार होण्यास, तसेच ईश्वराप्रती जिवाचा भाव वाढण्यास साहाय्य होते.

२. हळदीकुंकवातील पंचोपचार

अ. हळद-कुंकू लावणे

हळद-कुंकू लावणे, म्हणजे दुसर्‍या जिवातील श्री दुर्गादेवीची अप्रकट शक्ती जागृत करणे आणि तिला भक्तीभावाने आवाहन करून तिची कृपादृष्टी संपादन करणे होय.

आ. अत्तर लावणे

अत्तरातून प्रक्षेपित होणार्‍या गंधकणांमुळे देवतेचे तत्त्व प्रसन्न होऊन जिवासाठी अल्प कालावधीत कार्य करते. गंधकणांकडे देवतेचे तत्त्व आकृष्ट झाल्याने ते जिवासाठी व्यापक रूपात, म्हणजेच आवश्यक त्या उपरूपांत कार्य करते.

इ. गुलाबपाणी शिंपडणे

गुलाबपाण्यातून प्रक्षेपित होणार्‍या आपतत्त्वाशी संबंधित सुगंधित लहरींमुळे जिवाच्या सभोवताली असलेल्या वायूमंडलातील देवतेच्या सूक्ष्मतर लहरी कार्यरत होण्यास साहाय्य झाल्याने आपोआपच वातावरणशुद्धी होते. वातावरणातील त्रासदायक स्पंदने दूर झाल्यामुळे जिवाला कार्यरत देवतेच्या सगुण तत्त्वाचा लाभ अधिक मिळतो.

ई. ओटी भरणे

ओटी भरणे, म्हणजे श्री दुर्गादेवीच्या ब्रह्मांडात कार्यरत असणार्‍या इच्छाशक्तीला आवाहन करणे. श्री दुर्गादेवीची इच्छाशक्ती ही तिच्या ओटीपोटात संपुटित झालेली असल्याने ओटी भरणे, म्हणजे तिच्यातील संपुटित इच्छाशक्तीला आवाहन करून शरण जाणे होय. ओटी भरण्याच्या प्रक्रियेतून ब्रह्मांडातील श्री दुर्गादेवीची इच्छाशक्ती कार्यरत झाल्यामुळे श्रद्धेने ओटी भरणार्‍या जिवाच्या देहातून बाहेर पडणार्‍या इच्छालहरींचे घनीकरण होऊन जिवाची अपेक्षित इच्छा पूर्ण होते. देवतेच्या कार्यरत इच्छाशक्तीतूनच देवतेची कृपा लवकर संपादन करता येते. इच्छाशक्तीतूनच जिवाला साधना करण्याची स्फूर्ती मिळते. त्यानंतर साधनेतील पुढच्या टप्प्यात जिवाला देवतेच्या कार्यरत क्रियाशक्तीतून साधना म्हणून प्रत्येक कर्म करण्याची शक्ती प्राप्त होते आणि त्यानंतर कार्यरत ज्ञानशक्तीतून जिवाला वैराग्य प्राप्त होते. ओटी भरणे, म्हणजेच श्री दुर्गादेवीची निर्मितीची किंवा कार्य करण्याची इच्छा प्रबळ करणे होय.

उ. वाण देणे

वाण देतांना नेहमी पदराच्या टोकाचा वाणाला आधार देऊन देतात. वाण देणे, म्हणजे दुसर्‍या जिवातील देवत्वाला तन, मन आणि धन यांच्या त्यागातून शरण येणे होय. पदराच्या टोकाचा आधार देणे, म्हणजे अंगावरील वसनाच्या आसक्तीचाही त्याग करून देहबुद्धी त्यागण्यास शिकणे. हा काळ साधनेला पोषक असल्याने या काळात दिलेल्या वाणातून देवता लवकर प्रसन्न होऊन जिवाला इच्छित फलप्राप्ती होते, म्हणजेच दान सत्कारणी लागते.’ – सूक्ष्म जगतातील
‘एक विद्वान’ (५.१.२००५, सायं. ७.०१)

 

वाण देतांना पदराच्या टोकाचा वाणाला आधार देणे

चलच्चित्रपट (Video) – मकरसंक्रांतीला हळदी-कुंकू करण्याची पद्धत आणि त्यामागील शास्त्र

३. संक्रांतीनिमित्तचे हळदीकुंकू रथसप्तमीपर्यंतच करण्याचे महत्त्व

‘रथसप्तमीपर्यंतचा काळ हा तेजाला पुष्टी देणारा असल्याने या काळापर्यंत हळदीकुंकू केले जाते. त्यानंतर हळूहळू तेजाचे प्राबल्य न्यून होऊ लागल्याने प्रत्येक कृतीत वाईट शक्तींचा अडथळा येण्याचे प्रमाण वाढते आणि त्यामुळे विधीतून मिळणार्‍या पुण्यदर्शक फलप्राप्तीचे प्रमाणही न्यून होते; म्हणून तेजाच्या मारक तत्त्वास पुष्टी देणार्‍या आणि आदिशक्तीरूपी तेजाला आवाहन करणार्‍या हळदीकुंकूरूपी धार्मिक उपासनात्मक कृती रथसप्तमीपर्यंतच केल्या जातात.’ – सूक्ष्म जगतातील ‘एक विद्वान’ (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, ९.१.२००८, रात्री ११.२५)

 

४. वाण देतांना १३ प्रकारच्या वस्तू देण्याचे कारण

‘वाणाच्या रूपाने दाही दिशांच्या माध्यमातून स्थळदर्शकरूपी सर्व प्रकारची आसक्ती त्यागणे, तसेच या दिशामंडलाला कार्यरत करणार्‍या मूळ ब्रह्मांडातील तीन शक्तींच्या (इच्छा, क्रिया आणि ज्ञान) माध्यमातून आसक्तीविषयक मूळ काळदर्शक संस्कारही त्यागणे, असा १३ या वाणातील संख्येमागचा मूळ उद्देश आहे. १३ आकडा हा दाही दिशा आणि त्यांना कार्यरत करणार्‍या तीन ब्रह्मांडातील मूळ शक्ती यांचे दर्शक मानला गेलेला असल्याने या सर्वांच्या माध्यमातून १३ संख्यादर्शक वाणे देऊन कृती (स्थळ) आणि कर्म (काळ) यांच्या स्तरावर आसक्ती त्यागण्याचे हे द्योतक आहे; म्हणून ‘१३’ या आकड्याला विशेष महत्त्व आहे.’ – सूक्ष्म जगतातील ‘एक विद्वान’ (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, ९.१.२००८)

 

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘सण, धार्मिक उत्सव आणि व्रते’

1 Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Enjoy this blog? Please spread the word :)